बेळगाव : जिल्ह्यात २८ हजारांहून अधिक मोकाट कुत्रे असून, त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने श्वान निवारा केंद्रे उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण श्वान निवारा केंद्रांमध्ये करण्यात येईल. आक्रमक कुत्र्यांना अशा केंद्रांमध्ये ठेवण्यात येणार असून, शांत स्वभावाच्या कुत्र्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांच्या परिसरात सोडण्यात येईल.

जिल्ह्यातील मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर होत असल्याने श्वानप्रेमी, संबंधित संस्था आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच शासनाच्या मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही दोन टप्प्यांत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोकाट कुत्र्यांचे आक्रमक आणि शांत असे दोन प्रकार करण्यात येणार असून, त्यांना खाद्य देण्यासाठी निश्चित जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पीठा संघटना आणि श्वानप्रेमींशी चर्चा करून खाद्य देण्याची ठिकाणे निश्चित केली जातील. महापालिकेच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात येणार आहे.

नागरिकांनी मोकाट कुत्र्यांना रस्त्यावर किंवा जमिनीवर खाद्य देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत.

दरम्यान, एका सरकारी शाळेच्या तसेच जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आक्रमक कुत्र्यांचा कळप आढळून आला असल्याचेही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.