- बेळगावातील शिवम असोसिएट्स फसवणूक प्रकरण
- २,११० कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा तपास सुरू
बेंगळुरू : बेळगावातील शिवम असोसिएट्स फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवानंद नीलण्णावर यांना अटक केली आहे. मंगळूरू विभागातील ईडी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर मंगळूरू येथील विशेष ईडी न्यायालयाने नीलण्णावर यांना २४ ऑगस्टपर्यंत १२ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाच्या तपासात कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिवानंद नीलण्णावर यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे ईडीने म्हटले आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा आणि छत्तीसगडमध्येही या प्रकरणाशी संबंधित गुंतवणूक झाल्याचे तपासात समोर आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
ईडीच्या माहितीनुसार, पॉन्झी पद्धतीच्या योजनेद्वारे तब्बल २,११०.९७ कोटी रुपये बेकायदेशीररीत्या जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. या रकमेतून गुंतवणूकदारांना केवळ काही भागच परत करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे ईडीने नमूद केले आहे.
कंपनीला २०१९ पासून शेअर बाजारातील व्यवहारात तोटा होत होता. हा तोटा लपवण्यासाठी नवीन गुंतवणूकदारांकडून जमा केलेल्या पैशांचा वापर जुन्या गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात रक्कम देण्यासाठी करण्यात आल्याचा आरोपही ईडीने केला आहे.
तपासादरम्यान बेकायदेशीररीत्या जमा केलेल्या पैशांचा वापर आलिशान वाहने खरेदी करणे, बंगला बांधणे, भागीदारांच्या नावावर मालमत्ता घेणे तसेच चित्रपट निर्मितीसाठी करण्यात आल्याचे समोर आल्याचे ईडीने सांगितले आहे. हा निधी गुन्ह्यातून मिळालेली रक्कम असल्याचा तपास यंत्रणेचा दावा असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा पुढील तपास सुरू आहे.








