बेळगाव : पश्चिम घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराचा मुख्य पाणीस्रोत असलेले राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे. जलाशय पूर्ण भरल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बेळगाव महापालिकेच्या महापौर प्रीती कामकर यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने गंगापूजन करण्यात आले. जलाशय भरल्याने बेळगावकरांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी काळातील पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.
राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पाणीपातळी झपाट्याने वाढून जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याची प्रमुख गरज याच जलाशयातून भागविली जात असल्याने जलाशय तुडुंब भरल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पावसाळ्यात जलाशयात मुबलक पाणीसाठा झाल्याने आगामी उन्हाळ्यातही बेळगाव शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास महापौर प्रीती कामकर यांनी व्यक्त केला. पाणीसाठा चांगला झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी सांगितले की, जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस सुरू असल्याने अधिकारी पाणीपातळी आणि पाण्याच्या आवकेवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जलाशय परिसरातही आवश्यक दक्षता घेतली जात आहे.
बेळगावकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यात राकसकोप जलाशयाची महत्त्वाची भूमिका आहे. जलाशय पूर्ण भरल्याने आगामी काळातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी पालिका आयुक्त कार्तिक, पालिका सदस्य गिरीश धोंगडी, मंगेश पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.








