• सावगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : सावगाव येथील गायरान तसेच इतर सरकारी जमिनींचे सार्वजनिक हितासाठी संरक्षण करून या जागेवर कोणत्याही नवीन प्रकल्पाला परवानगी देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे जनावरांच्या चराईचा प्रश्न निर्माण होण्यासोबतच पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.

सावगावमधील सर्वे क्रमांक १३५/९, २३८, १२९, १४९, १३२, १३५ आणि १५३ या क्षेत्रात दोन एकरांहून अधिक सरकारी जमीन आहे. या जागेचा ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून विविध सार्वजनिक कारणांसाठी वापर केला जात आहे. जनावरांसाठी चराईची जागा, गो-स्मशान तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा उपक्रमांसाठी या जमिनीचा उपयोग होत असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

सदर सरकारी जमीन धरणालगत असल्याने येथे कचरा व्यवस्थापन अथवा अन्य कोणताही प्रकल्प उभारल्यास त्यातून निर्माण होणारे सांडपाणी किंवा दूषित घटक धरणाच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे जलप्रदूषणाचा धोका निर्माण होऊन त्याचा परिणाम पर्यावरण, जनावरे आणि नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

ही सरकारी जमीन कोणत्याही खासगी संस्था, व्यक्ती किंवा अन्य कारणासाठी हस्तांतरित करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जमिनीचा मूळ सार्वजनिक वापर बदलून तेथे कोणताही नवीन प्रकल्प उभारण्यास मंजुरी देऊ नये, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जनावरांची चराई, गो-स्मशान, विद्यार्थ्यांचे क्रीडा उपक्रम तसेच भविष्यातील सार्वजनिक गरजा लक्षात घेऊन ही जमीन कायमस्वरूपी सार्वजनिक वापरासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.

बेनकनहळ्ळी नगरपंचायतीचे माजी चेअरमन डॉ. यल्लाप्पा पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि माजी सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गावाच्या सार्वजनिक हितासाठी ही जमीन कायम राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.