बेळगाव : जुने बेळगाव येथील मराठी मुला-मुलींच्या शाळा क्रमांक ३३ च्या आवारातील धोकादायक पाण्याची टाकी हटविण्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून वापरात नसलेली ही जीर्ण टाकी कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

ही पाण्याची टाकी हटविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक तरुण आणि माजी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यापूर्वी अनेकदा निवेदने देऊनही कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

यानंतर प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेत टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आणि धोकादायक टाकी पाडण्याच्या कामाला सुरुवात केली. टाकी हटविण्याची कार्यवाही सुरू झाल्याने शाळेतील विद्यार्थी, पालक तसेच जुने बेळगावमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न मार्गी लागल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधी, प्रशासन तसेच माध्यमांचे आभार मानले आहेत.