- इंस्टाग्रामवरील भावनिक पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा
- भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाजाच्या कारकिर्दीचा शेवट
मुंबई : भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. इंस्टाग्रामवर भावनिक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. या पोस्टमध्ये त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), सहकारी खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले.
रहाणेने आपल्या पोस्टमध्ये, “कॅप २७८ आता निरोप घेत आहे. इतकी वर्षे दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचा मी कायम ऋणी राहीन,” असे लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या.
भारतासाठी रहाणेने ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ५,०७७ धावा करत १२ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली. त्याची सर्वोच्च खेळी १८८ धावांची राहिली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २,९६२ धावा करत ३ शतके आणि २४ अर्धशतके नोंदवली, तर टी-२० क्रिकेटमध्ये ३७५ धावा केल्या.
रहाणेने भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता. त्याचा शेवटचा वनडे सामना २०१८ मध्ये, तर टी-२० सामना २०१६ मध्ये झाला होता.
शांत, संयमी आणि विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अजिंक्य रहाणेने अनेक संस्मरणीय खेळी करत भारतीय क्रिकेटला महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका यशस्वी आणि प्रेरणादायी पर्वाचा शेवट झाला आहे.








