• संततधार पावसामुळे जलाशय तुडुंब
  • शहराचा नियमित पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता

बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बेळगाव शहराची तहान भागवणारा राकसकोप जलाशय अखेर बुधवारी ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे शहरावरील पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणात दूर होण्याची चिन्हे निर्माण झाली असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा मान्सूनने उशिरा जोर धरल्याने राकसकोप जलाशयातील पाणीपातळी चिंताजनकरीत्या घटली होती. जलाशयाने तळ गाठल्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे गंभीर सावट निर्माण झाले होते. परिणामी, नागरिकांना आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात होता.

मात्र, जुलै महिन्यात पावसाने जोरदार पुनरागमन केल्यानंतर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि पाण्याची आवक सातत्याने वाढत गेली. आठ दिवसांपूर्वी जलाशय पूर्ण भरण्यासाठी सुमारे दहा फूट पाण्याची आवश्यकता होती. सोमवारीही दोन फूट पाण्याची कमतरता होती. मात्र, मुसळधार पावसामुळे जलाशयात वेगाने पाणीसाठा वाढला आणि अखेर बुधवारी राकसकोप जलाशय ओव्हरफ्लो झाला.

बेळगाव शहराचा मुख्य पाणीपुरवठा राकसकोप जलाशयावर अवलंबून आहे. गतवर्षी जलाशय लवकर भरला होता, तर यंदा पावसाच्या विलंबामुळे जुलै अखेरीस तो तुडुंब भरला आहे.

जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने शहरातील पाणीपुरवठा लवकरच नियमित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या आठ ते दहा दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठा आता अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा बेळगावकरांकडून व्यक्त केली जात आहे.