• राज्यभर बेळगावच्या कचरा व्यवस्थापन मॉडेलची अंमलबजावणी होणार
  • सर्व महापालिकांना बॅलिस्टिक यंत्रणा देण्याची घोषणा

बेळगाव : बेळगाव येथील तुरमुरी घनकचरा व्यवस्थापन केंद्राला नगरविकास मंत्री डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांनी भेट देऊन केंद्रातील कचरा प्रक्रिया आणि आधुनिक व्यवस्थापनाची पाहणी केली. शंभर टक्के कचऱ्यावर प्रभावी प्रक्रिया होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत बेळगाव महापालिकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

यावेळी महापालिकेचे पर्यावरण अधिकारी हनुमंत कलादगी यांनी तुरमुरी केंद्रातील कचरा व्यवस्थापन प्रक्रिया, अत्याधुनिक यंत्रणा आणि कार्यपद्धतीची सविस्तर माहिती मंत्र्यांना दिली. त्यानंतर मंत्र्यांनी केंद्रातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.

मिश्र कचऱ्याचे प्रभावी वर्गीकरण करण्यासाठी अत्याधुनिक बॅलिस्टिक यंत्रणा वापरणारी बेळगाव महापालिका ही कर्नाटकातील एकमेव महापालिका असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक झाल्याचेही निदर्शनास आले.

तुरमुरी केंद्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी पद्धतीचे कौतुक करत डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांनी बेळगाव महापालिकेचे हे मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच कर्नाटकातील सर्व महापालिकांसाठी अशाच प्रकारची बॅलिस्टिक यंत्रे खरेदी करून उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.