- कामचुकार अधिकाऱ्यांना फटकारले
- अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करा ; अन्यथा निधी रोखण्याचा इशारा
बेळगाव : सुवर्ण विधानसौध येथे नगरविकास मंत्री डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आणि बुडा (BUDA) यांच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. रखडलेली कामे, निकृष्ट अंमलबजावणी आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींबाबत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला.
बैठकीत बेळगाव, धारवाड आणि कलबुर्गी येथे एल अँड टी कंपनीकडून सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये होणारा विलंब आणि रस्ते खोदून ते पूर्ववत न केल्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विकासकामे पूर्ण होताच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा संबंधित कामांचा पुढील निधी रोखण्याबरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर आर्थिक दंड आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी ग्रामीण भारत विकास योजनेअंतर्गत सुमारे ९० टक्के पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आलेली अनेक कामे प्रत्यक्षात अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री सिद्धरामय्या यांनी केवळ कागदोपत्री प्रगती न दाखवता प्रत्यक्षात कामे पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अपूर्ण प्रकल्पांची तातडीने पाहणी करून आवश्यक असल्यास अतिरिक्त निधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
रामतीर्थ नगर येथील बुडा वसाहत महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासह तेथील मूलभूत सुविधांबाबतही बैठकीत चर्चा झाली. आमदार अभय पाटील आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.
याशिवाय ₹१०० च्या बॉण्ड पेपरवर विकसित झालेल्या ले-आऊट्सना शासकीय रस्त्यांची जोडणी देताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवरही चर्चा झाली. खासगी जमिनीतून रस्ता जात असल्यास आवश्यक जमीन संपादित करून ती सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करण्याच्या पर्यायावर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीला महापौर प्रीती कामकर, उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, महापालिका आयुक्त कार्तिक एम. तसेच बुडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








