• याच आठवड्यात प्रक्रिया पूर्ण होणार
  • मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची घोषणा

बेंगळुरू : राज्यातील प्रलंबित मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात पूर्ण होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली. दिल्ली दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यांनी राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि विविध सिंचन प्रकल्पांबाबत केंद्रातील खासदारांशी चर्चा होणार असल्याची माहिती दिली.

सदाशिवनगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले की, दिल्लीतील बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाण्याची उपलब्धता तसेच कावेरी, म्हादई, मेकेदाटू आणि कृष्णा या महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांबाबत खासदारांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच या महत्त्वाच्या विषयांवर सर्व खासदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात असून, राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर केंद्राकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी त्यांचे सहकार्य मागितले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील बैठकीनंतर बंगळुरूमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येणार असून, राज्यातील वरिष्ठ नेत्यांशीही दुष्काळ, पाणी व्यवस्थापन आणि सिंचन प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करून पुढील रणनीती निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.