• प्रवासी बोर्डिंग ब्रिजच्या उभारणी आणि चाचणीला सुरुवात
  • ₹२२३ कोटींचा प्रकल्प अंतिम टप्प्यात
  • आधुनिक सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुलभ

बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या प्रवासी बोर्डिंग ब्रिज उभारणी आणि चाचणी प्रक्रियेला औपचारिक सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया इंटिग्रेटेड टेस्टिंग अँड कमिशनिंग अंतर्गत सुरू करण्यात आली असून, लवकरच नवीन टर्मिनल कार्यान्वित होण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवाशांना विमानात चढणे आणि उतरणे अधिक सुरक्षित, आरामदायी आणि जलद होणार आहे. याशिवाय विमानतळावरील प्रवासी हाताळणी क्षमता, सुविधा आणि एकूणच सेवा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार असल्याने प्रवाशांना आधुनिक विमानतळाचा अनुभव मिळणार आहे.

सुमारे २२३ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात चार अत्याधुनिक प्रवासी बोर्डिंग ब्रिज, १४ आधुनिक चेक-इन काउंटर, दोन बॅगेज कन्व्हेयर बेल्ट आणि विमान पार्किंगची क्षमता विद्यमान ३ वरून १२ विमानांपर्यंत वाढविण्याची सुविधा विकसित केली जात आहे. तसेच नवीन टर्मिनलमध्ये एकाच वेळी सुमारे २,४०० प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता निर्माण केली जात आहे.

या प्रकल्पामुळे बेळगाव विमानतळाच्या आधुनिकीकरणाला मोठी गती मिळणार असून, भविष्यात वाढणारी प्रवासी संख्या, नव्या विमानसेवा आणि मोठ्या विमानांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे. परिणामी, उत्तर कर्नाटकातील हवाई वाहतुकीच्या विकासात बेळगाव विमानतळ अधिक महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.