• जास्त परताव्याच्या आमिषाने कोट्यवधींची गुंतवणूक
  • जिल्हा प्रशासनाची कारवाई तीव्र

बेळगाव : जास्त व्याजदराचे आमिष दाखवून जनतेकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक उभारल्याच्या आरोपांप्रकरणी बेळगाव जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी आणखी दोन खासगी गुंतवणूक कंपन्यांवर धाड टाकली. शिवम असोसिएट्स आणि आदित्यराज कॅपिटलवरील अलीकडील कारवाईनंतर अनधिकृत गुंतवणूक कंपन्यांविरोधातील मोहिमेला अधिक वेग आला आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी श्रवण कुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली महसूल, सहकार आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने टिळकवाडी येथील ग्रोधन एलएलपी आणि महात्मा फुले रोडवरील सिटी इंडेक्स या कंपन्यांच्या कार्यालयांवर एकाचवेळी छापे टाकले. कारवाईदरम्यान आर्थिक व्यवहार, कागदपत्रे, गुंतवणूकदारांची माहिती आणि इतर दस्तऐवजांची सखोल तपासणी करण्यात आली.

प्राथमिक चौकशीत या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दरमहा चार ते पाच टक्के परताव्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणावर निधी उभारल्याचे समोर आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कारवाईदरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उपविभागीय अधिकारी श्रवण कुमार नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रोधन एलएलपीमध्ये सुमारे १,१०० गुंतवणूकदारांनी ३८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून ही रक्कम कर्जाच्या स्वरूपात वापरण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

तर सिटी इंडेक्समध्ये सुमारे १,५०० गुंतवणूकदारांनी जवळपास ३० कोटी रुपये गुंतवल्याचे तपासात समोर आले आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार ही रक्कम डिबेंचर्सच्या माध्यमातून उभारण्यात आली असून कंपनी सेबीकडे नोंदणीकृत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कंपनीच्या कायदेशीर स्थितीबरोबरच आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी सुरू आहे.

ग्रोधन एलएलपीवरील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असून सिटी इंडेक्सवरील तपास शनिवारीही सुरू राहणार आहे. संपूर्ण चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती श्रवण कुमार नायक यांनी दिली.

सार्वजनिक पैशांच्या कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर टिळकवाडी आणि शहापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संबंधित प्रकरणांची नोंद करण्यात आली असून, जास्त परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या संशयित गुंतवणूक कंपन्यांवर जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.