- सप्टेंबर अखेर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ
- २७० कोटींच्या पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू
- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाची तयारी
बेळगाव : शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला अखेर गती मिळाली असून, सप्टेंबरअखेर कोणत्याही परिस्थितीत काम सुरू करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यासाठी २७० कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून ती ऑगस्टअखेर पूर्ण होणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये निविदा अंतिम करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा आराखडा पुढील तीन महिन्यांत अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पर्यायी वाहतूक मार्गांचा आराखडा तयार केला आहे. तात्पुरती बॅरिकेडिंग, पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती आणि प्राथमिक सुविधा उभारण्यासाठी प्रकल्पातील ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वीजवाहिन्या, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाच्या वाहिन्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचाही खर्च मूळ प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने प्रकल्पाच्या मार्गातील झाडांची सरसकट तोड न करता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ती जवळील शासकीय जागांवर एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात पुनर्लागवड करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना कमीत कमी गैरसोय होण्यासाठी लवकरच विविध घटकांची व्यापक सल्लागार बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
या बैठकीला पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा वनसंरक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








