- गुप्त प्रवासात बीएमटीसी सेवेची वास्तवस्थिती उघड
- चालक-वाहकाविरोधात तातडीची कारवाई
बेंगळुरू : कर्नाटकचे परिवहन मंत्री भैरथी सुरेश यांनी बीएमटीसी बससेवेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सामान्य प्रवाशाप्रमाणे चेहरा झाकून गुप्तपणे बसप्रवास केला. यावेळी सुट्टे पैसे नसल्याचे कारण देत वाहकाने त्यांना बसमधून उतरून जाण्यास सांगितल्याने दैनंदिन प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींचा अनुभव मंत्र्यांना स्वतःलाच आला.
शनिवारी जवळपास दोन तास मास्क घालून १० हून अधिक बीएमटीसी बसमधून प्रवास करताना मंत्र्यांनी प्रवाशांकडून वारंवार मांडल्या जाणाऱ्या विविध तक्रारींची प्रत्यक्ष पडताळणी केली. या पाहणीत अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या.
यावेळी फन वर्ल्ड बसथांब्यावर एका प्रवाशाने उतरायचा इशारा करूनही बस न थांबवल्याचा प्रकार घडला. ही बाब लक्षात येताच परिवहन मंत्री भैरथी सुरेश यांनी संबंधित चालक आणि वाहकाला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, हेब्बळ – नागशेट्टीहळ्ळी मार्गावरील बसमध्ये प्रवास करताना मंत्र्यांनी तिकीटासाठी वाहकाला १०० रुपयांची नोट दिली. मात्र, सुट्टे पैसे नसल्याचे सांगत वाहकाने तिकीट देण्याऐवजी त्यांना बसमधून उतरून जाण्यास सांगितले. या घटनेमुळे सामान्य प्रवाशांना रोज भेडसावणाऱ्या समस्येची जाणीव मंत्र्यांना प्रत्यक्ष झाली.








