• अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन 
  • स्थानिक रहिवाशांचा इशारा

बेळगाव : शहरातील चव्हाट गल्लीत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत, येत्या शुक्रवारपर्यंत समस्या निकाली काढावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सहा महिन्यांपासून परिसरातील मुख्य गटार वाहिनी फुटल्याने सांडपाणी पिण्याच्या पाणीपुरवठा वाहिनीत मिसळत आहे. त्यामुळे विष्ठामिश्रित दूषित पाणी नळांद्वारे घरांपर्यंत पोहोचत असून, नागरिकांना आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक आजारी पडत असून, अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचा दावा रहिवाशांनी केला.

यापूर्वी महानगरपालिकेकडून नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा होत होता. मात्र, पाणीपुरवठ्याची जबाबदारी खासगी कंपनीकडे गेल्यानंतर ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दूषित पाण्याचे व्हिडिओ पुरावे तसेच लेखी तक्रारी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना देऊनही अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

दरम्यान, परिसरातील भूमिगत गटार (यूजीडी) प्रकल्पाचे कामही रखडले असून, त्यामागे भ्रष्टाचार आणि कमिशनखोरी असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. या कामासाठीचा निधी चार महिन्यांपूर्वी मंजूर झाला असतानाही अधिकारी आणि कंत्राटदार एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने कामाला गती मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या महिन्यातून केवळ दोन ते तीन वेळाच पाणीपुरवठा केला जात असून तेही दूषित असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांच्या तीव्र संतापाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास महिला आणि नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.