• बीएलओंशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आवाहन
  • पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना लवकरच पदे देण्याचे संकेत

बेळगाव : राज्यात सुरू असलेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेदरम्यान मतदार यादीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, तसेच पात्र मतदारांची नावे विनाकारण वगळली जाणार नाहीत, यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी केले. पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना लवकरच विविध समित्या आणि महामंडळांवर संधी दिली जाईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेळगाव येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. देशभर आणि राज्यात सुरू असलेल्या विशेष मतदार नोंदणी (एसआयआर) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून विविध प्रकारच्या रणनीती राबवल्या जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी यापूर्वी पश्चिम बंगालमधील निवडणुकांतील अनुभवाची आठवण करून दिली. कर्नाटकमध्ये अशा प्रकारच्या त्रुटी होऊ नयेत म्हणून केपीसीसी आणि जिल्हा काँग्रेस समित्यांच्या माध्यमातून आधीच आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मतदार नोंदणी आणि मतदार ओळखपत्र वितरणाची प्रक्रिया सुरू असताना प्रत्येक मतदारसंघातील बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी सातत्याने संपर्क ठेवावा. पात्र मतदारांची नावे कोणत्याही कारणाशिवाय वगळली जाणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. तसेच सदस्य नोंदणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या १३ निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी पक्षातील कार्यकर्त्यांच्या नियुक्त्यांबाबत बोलताना डॉ. परमेश्वर म्हणाले, पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विविध समित्या आणि महामंडळांवर संधी देण्यासाठी यापूर्वी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने सुमारे ८०० कार्यकर्त्यांची नावे विविध पदांसाठी सुचविली होती. मात्र काही कारणांमुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता नवीन मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावर आल्यानंतर या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली असून, पात्र कार्यकर्त्यांना लवकरच जबाबदाऱ्या मिळाव्यात यासाठी आपण आग्रही भूमिका मांडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.