- आरोपी पतीला अथणी पोलिसांकडून अटक
बेळगाव : जिल्ह्यातील अथणी तालुक्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अथणी पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने अटक केली आहे.
ही घटना अथणी तालुक्यातील नंदगाव येथील श्री अवजीकर मठ परिसरात घडली. शोभा परगोंडा सारवाड (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून, परगोंडा संगप्पा सारवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या चार वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यावर विनाकारण संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. कुटुंबातील ज्येष्ठांनी अनेकदा त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही.
अखेर २८ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घरात झोपलेल्या पत्नीच्या गळ्यावर आणि हातावर आरोपीने कुऱ्हाडीने बेछूट वार केले. गंभीर जखमी झालेल्या शोभा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मृत महिलेचे भाऊ महांतेश गुरप्पा पाटील यांनी अथणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला तातडीने अटक केली.
या घटनेची माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास अथणी पोलीस करत असल्याचे सांगितले.








