• बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई ; १६८ ग्रॅम गांजा, कारसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने कारमधून गांजाची विक्री करणाऱ्या हुबळी येथील एका तरुणाला शिताफीने अटक केली आहे. व्हीटीयू क्रॉसजवळील जांबोटी-बेळगाव मार्गावरील मच्छे परिसरात सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव निखील मायकल डेव्हिड (वय ३७, रा. केशवापूर, हुबळी) असे आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. सरनायक आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून १६८ ग्रॅम गांजा, एक कार आणि एक मोबाईल फोन असा एकूण ७ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजा विक्रीच्या जाळ्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.