चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील जोडकुर्ली गावात दुकान बंद करत असताना विजेचा धक्का लागून टायर दुकानाच्या मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पवन माने (वय २८) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन माने हे जोडकुर्ली गावात टायरचे दुकान चालवत होते. नेहमीप्रमाणे रात्रीचे काम आटोपून ते दुकान बंद करत असताना दुकानातील शॉर्ट सर्किट किंवा जुन्या वायरिंगमुळे वीज प्रवाहित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचवेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जुन्या वीज वाहिन्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि हेस्कॉमचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून घटनेची पाहणी केली असून, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.