• उद्यापासून नव्या ठिकाणाहून सेवा

बेळगाव : शहरातील कॅम्प पोलीस ठाण्याचे सोमवार, दि. २९ जून २०२६ पासून नव्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असून, यापुढे ठाण्याचे कामकाज ग्लोब चित्रपटगृहासमोरील बीएसएनएल इमारतीतून सुरू राहणार आहे.

हाय स्ट्रीटवरील बी.सी. क्र. ९७ येथील कॅम्प पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची संरचनात्मक सुरक्षितता धोक्यात आल्याने ही तात्पुरती स्थलांतराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पोलीस सेवा अधिक सुरक्षित आणि सुरळीतपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, कॅम्प पोलीस ठाण्याशी संबंधित सर्व तक्रारी, अर्ज, पडताळणीची कामे तसेच इतर पोलीस सेवांसाठी नागरिकांनी सोमवारपासून नव्या बीएसएनएल इमारतीतील पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.