बेळगाव : छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मच्छे येथील कु. पुष्कर परशराम कोलेकर याने द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

रविवार, २१ जून २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत बेळगाव परिसरातील सुमारे ४० हायस्कूल विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रभावी वक्तृत्व, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि विषयावरील सखोल अभ्यासाच्या जोरावर पुष्करने परीक्षकांची मने जिंकत द्वितीय क्रमांक मिळवला.

पुष्कर हा सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छेचा माजी विद्यार्थी असून सध्या ठळकवाडी हायस्कूल, टिळकवाडी येथे शिक्षण घेत आहे. या यशाबद्दल प्रा. डॉ. मधुकर जाधव यांच्या हस्ते त्याला सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या यशासाठी ठळकवाडी हायस्कूलचे शिक्षक सी. वाय. पाटील तसेच सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील शिक्षकांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. पुष्करच्या या यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक, माजी शिक्षकवृंद आणि परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.