कोल्हापूर : १५२ व्या राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त गंगाधर वृत्तपत्राच्या वतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषदे’त बेळगाव सीमाभागातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक व विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय कार्य करणारे प्राचार्य आनंद आपटेकर यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

मोहमेडन एज्युकेशन सोसायटी हॉल, दसरा चौक, कोल्हापूर येथे झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. शंकर अंदानी (अहिल्यानगर) होते. पद्मश्री उदय देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते प्राचार्य आनंद आपटेकर यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. उद्घाटन संपादक श्रीराम पच्छिंद्रे, सीमाकवी रवींद्र पाटील, शिक्षक नेते दादासाहेब लाड तसेच भूदरगडच्या माजी सभापती अक्काताई नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्राचार्य आनंद आपटेकर हे बेळगाव सीमाभागातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठी सातत्याने कार्यरत असलेले धडाडीचे व्यक्तिमत्त्व आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे.

ते बेळगाव मध्यवर्ती दसरा कमिटीचे अध्यक्ष, बेळगावचा राजा गणेश मंडळ (चवाट गल्ली)चे सचिव, श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळाचे खजिनदार, मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे सरचिटणीस, भारतीय गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक-सचिव तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमाभाग वैद्यकीय समन्वयक म्हणून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. त्यांच्या बहुआयामी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी साहित्यिक किसनराव कुऱ्हाडे, लक्ष्मण किल्लेकर, संदीप कदम व परशराम गाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या कार्याचा झालेला हा गौरव बेळगाव सीमाभागासाठी अभिमानास्पद मानला जात असून, उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.