• घरासह कार्यालय आणि वाहनांची तोडफोड
  • हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

बेळगाव : हिंडाल्को कंपनीतील एका तरुणाच्या आत्महत्येनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बेळगावचे माजी महापौर बसप्पा चिक्कलदिन्नी यांच्या निवासस्थानासह कार्यालयावर हल्ला केला. या घटनेत वाहनांचे नुकसान झाले असून हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी माजी महापौरांनी केली आहे.

हिंडाल्को कंपनीत कार्यरत असलेल्या एका तरुणाने बुधवारी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित चिठ्ठीत त्याने नोकरी कायम करण्यासाठी रामाचारी नावाच्या व्यक्तीला ५ लाख रुपये दिल्याचा आरोप केला होता. तसेच कंत्राटदारांकडून भरती प्रक्रियेत जवळच्या नातेवाईकांना प्राधान्य दिले जात असल्याचाही उल्लेख करण्यात आला होता.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या मुत्त्यानट्टी गावातील नागरिकांनी बसप्पा चिक्कलदिन्नी यांच्या घरावर आणि कार्यालयावर दगडफेक केली. या हल्ल्यात काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

घटनेनंतर प्रतिक्रिया देताना माजी महापौर बसप्पा चिक्कलदिन्नी यांनी कंपनीतील भरती प्रक्रियेत स्थानिक तरुणांनाच प्राधान्य देण्यात येत असल्याचा दावा केला. तसेच मृत तरुणाने चिठ्ठीत उल्लेख केलेल्या रामाचारी नावाच्या व्यक्तीशी आपला किंवा आपल्या संस्थेचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हा हल्ला वैयक्तिक आणि राजकीय द्वेषातून घडवून आणण्यात आल्याचा आरोप करत, लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या घटनेप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.