अंकली : लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा भाग असलेल्या आषाढी वारीसाठी दरवर्षीप्रमाणे आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करण्यासाठी शितोळे अंकली येथून माऊलींच्या मानाचे अश्व उद्या शनिवारी २७ जून रोजी सकाळी शितोळे सरकार राजवाड्यातून आळंदी कडे प्रस्थान करणार असल्याची माहिती उर्जितसिंगराजे शितोळे सरकार यांनी दिली आहे.

वारीचे यंदाचे १९४ वे वर्ष असून शितोळे घराण्याकडे असलेल्या माऊलींच्या अश्वांचा मान व परंपरा यांचे निष्ठेने पालन केले जात आहे. आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीसाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. अंकली ते आळंदी या अकरा दिवसांच्या प्रवासासाठी शनिवारी २७ जून रोजी अंकलीकर शितोळे सरकार राजवाड्यातून सकाळी नऊ वाजता माऊलींच्या अश्वांचे प्रस्थान वारकरी ग्रामस्थ भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे.मानाच्या अश्वांसोबत वीस ते पंचवीस जणांचा लवाजमा राहणार आहे. ७ जुलै रोजी दोन्ही अश्व आळंदीत दाखल होतील.