• जन्म-मृत्यू हेल्पलाईन केंद्राचाही शुभारंभ

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या ५ टक्के कल्याणकारी निधीअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने २६ लाभार्थ्यांना त्रिचक्र वाहनांचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात महापालिकेच्या नव्या जन्म-मृत्यू हेल्पलाईन केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले.

उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, महापौर प्रीती कामकर तसेच अन्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. महानगरपालिकेच्या कल्याणकारी योजनेतून सुमारे ३८.९८ लाख रुपयांच्या निधीचा वापर करून दिव्यांगांसाठी ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी दिव्यांग नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी अशा योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले. गरजू घटकांना आवश्यक मदत पुरविण्यासाठी महानगरपालिका आणि शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शहरातील खेळाडूंना क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापौर प्रीती कामकर यांनी लाभार्थ्यांनी या सुविधेचा दैनंदिन जीवनात आणि प्रगतीसाठी प्रभावी वापर करावा, असे आवाहन केले. उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी महानगरपालिका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विविध माध्यमांतून प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास उपमहापौर हनुमंत कोंगाळी, सभागृह नेते संतोष पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्षा राठोड, नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.