• पाही वाईब्स फाउंडेशन व शक्ती सामर्थ्य फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आणि शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन देण्यासाठी पाही वाईब्स फाउंडेशन आणि शक्ती सामर्थ्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिवनगर येथील शासकीय शाळा क्रमांक २२ मध्ये पुस्तक वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना उपयुक्त व दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध करून देणे हा होता. विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके वितरित करण्यात आली. यामुळे त्यांच्या ज्ञानवृद्धीसह वाचनाची आवड वाढण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी नवज्योत टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमित नाईक यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या प्रायोजकत्वामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तकांचे वितरण करणे शक्य झाले.

कार्यक्रमात दोन्ही संस्थांच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. भुविका, शिरदेव, विजय, शिवानंद, श्वेता आणि लक्ष्मण यांच्यासह अनेक सदस्यांनी नियोजन व अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली.

यावेळी पाही वाईब्स फाउंडेशनच्या संस्थापक-संचालिका रक्षा यू आणि शक्ती सामर्थ्य फाउंडेशनच्या संस्थापक-संचालिका लता अनासकर यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पुस्तकांमुळे ज्ञान, आत्मविश्वास आणि भविष्य घडविण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

शिक्षण, सामाजिक विकास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्याचा निर्धार दोन्ही संस्थांनी व्यक्त केला.