- १९ भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग ; भक्तिमय वातावरणात भजन कार्यक्रम संपन्न
बेळगाव : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेळगावातील १९ भजनी मंडळांतील ४७५ महिलांनी एकत्र येत हरिनामाचा गजर केला. १८ जून रोजी झालेल्या या विशेष भजन कार्यक्रमात महिलांनी अभंग गायन सादर करत मंदिर परिसर भक्तिरसाने भारावून टाकला.
हा कार्यक्रम श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे उपाध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे शिष्य धनंजय जवंजाळ यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर ट्रस्ट समिती यांची अनुमती तसेच बेळगाव येथील शंकर लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात रुपावलीने करण्यात आली. त्यानंतर ‘गोड गोड तुझे नाम’, ‘गणेश शारजा’, ‘त्रिशुळावरी काशीपुरी’, ‘काय सांगू आता संतांचे उपकार’ यांसह एकूण १५ अभंगांचे सादरीकरण करण्यात आले. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात उपस्थित भाविकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत हरिनामात तल्लीन होण्याचा अनुभव घेतला.
भजन गायनामुळे मंदिर परिसरात संपूर्ण वेळ भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कोल्हटकर यांनी केले.







