• मध्यस्थी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला
  • सर्व संशयित युवक ताब्यात

बेळगाव : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या वेळी वाद मिटवण्यासाठी पुढे आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावरही संतप्त युवकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मार्केट पोलिसांनी संबंधित सर्व संशयित युवकांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दोन गटांतील युवक भररस्त्यात एकमेकांशी भिडले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मल्लीकार्जुन गुंजीकर यांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटांतील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, वादावादी सुरू असतानाच काही युवकांनी पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत त्यांच्यावरच हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तातडीने मार्केट पोलीस ठाण्याकडून अतिरिक्त कुमक मागवली.

घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना ताब्यात घेत परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली.  त्यानंतर सर्व संशयितांना पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटांमधील वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला आणि पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला का करण्यात आला, याचा तपास मार्केट पोलीस करत आहेत.