चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील एका उर्दू सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकावर विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेनंतर संतप्त पालकांनी संबंधित शिक्षकाला शाळेच्या आवारातच मारहाण केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत कन्नड विषय शिकवणारे शिक्षक श्रीशैल कुंभार यांच्यावर दहावीतील काही विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत. विद्यार्थिनींना परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती पालकांना मिळाल्यानंतर त्यांनी शाळेत धाव घेऊन संबंधित शिक्षकाला जाब विचारला.
यावेळी संतप्त झालेल्या काही पालकांनी शिक्षकाला मारहाण केल्याने शाळा परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले असून, या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विद्यार्थिनींनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी सुरू असून, तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.








