खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २२ जून रोजी बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे नागरिकांना आंदोलनाची माहिती देत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
जनजागृती मोहिमेदरम्यान खानापूर शहरातील विविध भागांमध्ये पत्रकांचे वितरण करण्यात आले. आंदोलनाचा उद्देश, सीमाभागातील भाषिक प्रश्न आणि मराठी भाषिकांच्या मागण्यांविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ही मोहीम केवळ खानापूर शहरापुरती मर्यादित नसून तालुक्यातील इतर भागांमध्येही ती राबविण्यात येणार आहे. त्यानुसार मंगळवारी जांबोटी येथे तर बुधवारी नंदगड येथे पत्रकांचे वाटप करून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.
या मोहिमेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा तसेच जनजागृती अधिक प्रभावी करण्यासाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, २२ जून रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.








