पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यात होणार आहे. हे ऐतिहासिक संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात भरविण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे रविवारी महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शंभरावे संमेलन असल्याने ते भव्य, ऐतिहासिक आणि संस्मरणीय स्वरूपात आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते.
संमेलनाच्या स्थळ आणि तारखांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व सभासदांनी एकमताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची निवड केली. यापूर्वी स्थळ निवड समितीने एस. पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी करून विविध सुविधांचा आढावा घेतला होता.
या पाहणी दौऱ्यात अध्यक्ष योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ आणि लखनसिंह कटरे सहभागी झाले होते. त्यांनी विविध ठिकाणांच्या सुविधा, प्रांगणाचा विस्तार, वाहनतळ, निवास व्यवस्था आणि इतर आवश्यक बाबींचा अभ्यास केला.
बैठकीत उपस्थित सदस्यांनी विद्यापीठ परिसर संमेलनासाठी सर्वार्थाने योग्य असल्याचे मत व्यक्त केले. तसेच संमेलनाच्या आयोजनासाठी विद्यापीठ प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभणार असल्याची माहितीही देण्यात आली.
या सर्व बाबींचा विचार करून शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला. या बैठकीस संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह महामंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.







