- केएससीएचे अध्यक्ष तथा माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांची ग्वाही
बेळगाव : बेळगावच्या केएससीए मैदानावर आगामी काळात बीसीसीआयच्या देशांतर्गत तसेच सराव सामन्यांचे आयोजन करण्यात येणार असून, क्रिकेटप्रेमींना लवकरच चांगल्या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे, अशी ग्वाही केएससीएचे अध्यक्ष तथा माजी भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी दिली.
बेळगावमधील बी.के. मॉडेल कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यंकटेश प्रसाद यांनी बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या आसनक्षमतेबाबत नाराजी व्यक्त केली. आयपीएल सामने पाहण्यासाठी दिवसेंदिवस प्रेक्षकांची मागणी वाढत असून, सध्या स्टेडियमवर आसनक्षमतेची मर्यादा जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. स्टेडियमची क्षमता ३२ हजार प्रेक्षकांची असली तरी केवळ २७ हजार प्रेक्षकांनाच सामना पाहण्याची संधी मिळत आहे. तसेच मैदानावर ३६० अंश कोनातून सामना पाहणेही सध्या शक्य नसल्याने स्टेडियम अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कामासाठी राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा मिळत असून, आगामी ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय तर डिसेंबरमध्ये टी-२० सामने बंगळुरूमध्ये खेळविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हुबळीमध्ये महाराजा ट्रॉफी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला असून, या कार्यक्रमाला क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले. तसेच हुबळीचे सुपुत्र अविनाश वैद्य यांची बीसीसीआयच्या व्यवस्थापकपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ही संपूर्ण उत्तर कर्नाटकासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करत, आगामी काळात महाराजा ट्रॉफीमध्ये आणखी नवीन संघांचा समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेळगावच्या केएससीए मैदानावर सामने का आयोजित केले जात नाहीत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता व्यंकटेश प्रसाद यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. हा प्रश्न यापूर्वीच्या व्यवस्थापन समितीला विचारायला हवा होता. आम्ही बीसीसीआयच्या सामन्यांच्या आयोजनात कोणताही भेदभाव केलेला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, हुबळीमध्ये रणजी करंडकाचा अंतिम सामना यशस्वीपणे आयोजित करण्यात आला असून, कलबुर्गी आणि रायचूरसारख्या भागांनाही समान प्राधान्य दिले जात आहे. बेळगावचे मैदान आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी सध्या योग्य नसले तरी बीसीसीआयचे देशांतर्गत सामने आणि सराव सामने आयोजित करण्यासाठी हे मैदान अत्यंत चांगले आहे. त्यामुळे आगामी काळात बेळगावमध्ये निश्चितपणे सामने खेळविले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला अविनाश पोतदार, वादिराज पाटील, विलास जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.








