बेळगाव / प्रतिनिधी

रक्तदान हे महादान म्हणून गणले जाते. त्यामुळे रक्तदानाबद्दल कोणतेही गैरसमज ठेवून घेऊ नयेत. तसेच स्वयंप्रेरणेतून रक्तदान करावे. असे मार्गदर्शन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. डी. टी.बामणे यांनी केले. आधार एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ संस्थेच्या सहकार्यातून हा उपक्रम पार पडला. यामध्ये 30 हून अधिक सदस्यांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले. तसेच बिम्स हॉस्पिटल, बेळगाव ब्लड बँक आणि विनायक नगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने या शिबिरात रक्तदान करून घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांनी या उपक्रमासाठी उपस्थित राहून संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. विनायक नगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल वड्डर यांनी फीत कापून कक्षाचे उद्घाटन केले. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर डॉ. प्रशांत भोसले यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले.
व्यासपीठावर संस्थेच्या व्हाईस चेअरमन डॉ. पूजा बामणे, उपप्राचार्य डॉ. एम. एम. साणिकोप, रोटरी नॉर्थ चे अध्यक्ष विकास गाडवी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. चंद्रशेखर, संस्थेचे संचालक डॉ. रोहित बामणे, डॉ. अभिषेक बामणे आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मानसी चिंचणीकर यांनी केले. शिबिर संयोजनासाठी कॉलेजच्या कर्मचारी वर्गाने पुढाकार घेतला होता.