बेळगाव : विश्वासाने सांभाळण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी दिलेले सोन्याचे दागिने व हार मालकाला न सांगता अपहार करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून १५.७३ लाख रुपये किमतीचे १०३.९७ ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे.

कृष्णा मोहन मैती (वय ३६, मूळ रा. विजयवाडा, आंध्र प्रदेश, सध्या रा. शहापूर, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नार्वेकर गल्ली परिसरात घडलेल्या या प्रकरणात विश्वासाने दिलेले सोन्याचे दागिने आणि दुरुस्तीसाठी दिलेला सोन्याचा हार आरोपीने परस्पर लंपास केल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेतला. चौकशीनंतर आरोपीकडून १५ लाख ७३ हजार ३७० रुपये किमतीचे एकूण १०३.९७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१६(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

बेळगावचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी, पीएसआय मणिकंठ पुजारी, महिला पीएसआय एस. एन. बस्वा तसेच त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी तपास पथकाचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.