- वृत्तांकनास विरोध केल्याचा आरोप ; पत्रकारांची पोलिसांत तक्रार
- चार महिला कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बेळगाव : आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध बहुकोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर भाग्यनगर येथील कंपनीच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाचे वृत्तांकन करण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींशी गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी चार महिला कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीविरोधातील कारवाई आणि कार्यालयातील घडामोडींची माहिती घेण्यासाठी विविध माध्यमांचे प्रतिनिधी कार्यालय परिसरात दाखल झाले होते. यावेळी काही महिला कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना प्रश्न विचारण्यास तसेच चित्रीकरण करण्यास विरोध केल्याचे सांगितले जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत माध्यम प्रतिनिधींशी वाद घातल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काही कर्मचारी एकत्र येत पत्रकारांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच अपमानास्पद शब्दांचा वापर करून पत्रकारांना तेथून निघून जाण्यास सांगण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे काही काळ कार्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
याचदरम्यान काही पुरुष कर्मचाऱ्यांनीही माध्यम प्रतिनिधींशी शाब्दिक चकमक केल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे मालक बालराज माने यांच्या समर्थनार्थ काही कर्मचारी उघडपणे भूमिका घेत असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले. माहिती बाहेर जाऊ नये यासाठी पत्रकारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माध्यम प्रतिनिधींनी केला आहे.
दरम्यान, आदित्यराज कॅपिटलविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे आधीच शहरात खळबळ उडाली असून, संबंधित यंत्रणांकडून तपास आणि पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांशी झालेल्या कथित गैरवर्तनामुळे पत्रकार संघटनांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. माहिती संकलन आणि वृत्तांकन करणे हा पत्रकारांचा घटनादत्त अधिकार असून, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची अरेरावी किंवा धक्काबुक्की होणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर पत्रकारांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी पत्रकारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आदित्यराज कॅपिटलच्या चार महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघटनांकडून करण्यात आली आहे.








