• १३ आरोपी अटकेत 
  • कातगाळीत गावठी बंदूक कारखान्यावर धाड
  • खानापूर पोलिसांची कारवाई

बेळगाव : खानापूर तालुक्यातील कातगाळी गावात बेकायदेशीरपणे गावठी बंदुकांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या टोळीचा खानापूर पोलिसांनी पर्दाफाश करत १३ जणांना अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी बेळगावमधील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कारवाईत नऊ गावठी बंदुका, दारूगोळा आणि शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, तालुक्यातील बेकायदेशीर शस्त्रनिर्मितीचे जाळे उघडकीस आले आहे.

या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन पुढे म्हणाले, मारुती श्रीकांत सुतार हा संशयित २०२४ पासून स्वतःच्या घरातच गावठी बंदुका तयार करून त्यांची विक्री करत होता. गुप्त माहितीच्या आधारे खानापूर पोलिसांनी कातगाळी येथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तयार केलेल्या आणि विकलेल्या बंदुकांचा तपशील समोर आला.

पोलिसांनी मुख्य आरोपीसह बंदुकीचे सुटे भाग, दारूगोळा आणि आर्थिक मदत पुरवणाऱ्या इतर साथीदारांनाही अटक केली आहे. यामध्ये बंदुकीच्या बॅरलचे वेल्डिंग करणाऱ्या एका कारागिराचाही समावेश आहे.

कारवाईदरम्यान ट्रिगर, बंदुकीचे सुटे भाग, शिशाच्या गोळ्या, जिवंत काडतुसे आणि इतर साहित्य असा मोठा साठा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या सर्व १३ आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.