• काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड
  • सिद्धरामय्यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सर्व आमदारांचा पाठिंबा

बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणातील अनेक दिवसांच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी डी. के. शिवकुमार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. विधानसौध येथे झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतः शिवकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर डॉ. जी. परमेश्वर यांनी त्याला अनुमोदन दिले. उपस्थित सर्व आमदारांनी एकमुखाने पाठिंबा दर्शवल्यानंतर त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

बैठकीच्या सुरुवातीला विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्याची निवड करण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींना देण्याचा एक ओळीचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि पुढील प्रक्रियेनंतर डी. के. शिवकुमार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

निवडीची घोषणा करताना एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे मुख्यमंत्रीपदाचा मार्गही मोकळा झाला आहे.

निवडीनंतर डी. के. शिवकुमार यांनी मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाचे आणि त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांचे कौतुक केले. यासंदर्भातील ठरावही बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

कर्नाटकच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या घडामोडीनंतर आता डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ कधी घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.