विजापूर : चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात जमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनंतर बेळगाव विभागाचे आयजीपी संदीप पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
शुक्रवारी दुपारी गोविंदपूर येथील शेत परिसरात हा रक्तरंजित प्रकार घडला. या घटनेत दुंडप्पा निराळे, शिवपुत्र निराळे, चंद्रकांत निराळे, राहुल निराळे, समर्थ निराळे आणि शब्बीर अत्तार यांचा मृत्यू झाला आहे. तर अरविंद कटगे आणि जेसीबी चालक संदीप माने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच आयजीपी संदीप पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. त्यांनी तपासाच्या प्रगतीची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आरोपींचा शोध घेऊन प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले.
या घटनेमागे जुन्या जमिनीच्या वादाचे कारण असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन चडचण परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून डीएआर आणि केएसआरपीच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून या सामूहिक हत्याकांडामुळे विजापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींच्या अटकेनंतर या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.








