- संकेश्वर पोलिसांची कारवाई
- ६ लाखांहून अधिक किमतीच्या गाड्या जप्त
संकेश्वर : संकेश्वर आणि जिल्ह्यातील विविध भागांतून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीविरोधात कारवाई करत संकेश्वर पोलिसांनी दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे ६ लाख १० हजार रुपये किमतीच्या १४ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पहिल्या प्रकरणात गिरिष तुकाराम सत्यनाईक (रा. भीमनगर, संकेश्वर) यांची दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार संकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्यानंतर बाबुगोडा चंद्रगौडा पाटील (रा. हुक्केरी रोड, संकेश्वर) यांच्या घरासमोरूनही दुचाकी चोरी झाली होती.
या घटनांचा तपास करताना पोलिसांनी संशयितांचा मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेला. तपासादरम्यान संकेश्वर, चिकोडी, यमकनमर्डी, बेळगाव शहर आणि गडहिंग्लज परिसरातून तब्बल १० दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. या प्रकरणात अंदाजे ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
या गुन्ह्यात अमित बसवराज कोळी (वय २१) आणि आनंद यल्लाप्पा घस्ती (वय ३८, दोघे रा. मुत्नाळ, ता. गडहिंग्लज) यांना अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या प्रकरणात सुमित गंगाराम कम्मार (वय २१, रा. निडसोशी), शिवराज निगौंडा पाटील (वय २१, रा. कमतनूर), ओंकार मोहन कडलगी (वय २०, रा. कडलगे, ता. गडहिंग्लज) आणि किरण हेमंत कम्मार (वय १८, रा. निडसोशी) या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर निडसोशी, अंकले आणि गोकाक परिसरातून चोरी करण्यात आलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. या वाहनांची किंमत सुमारे १ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या सर्व आरोपींविरोधात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ पोलीस निरीक्षक गणपती कोगनोळी, उपनिरीक्षक विठ्ठल नाईक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमेश शेट्टण्णावर, सी. जी. सारापुरे आणि पोलिस पथकाने केली.








