चिक्कोडी : वाढत्या उन्हामुळे चिक्कोडी आणि रायबाग तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून, नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चिक्कोडी तालुक्यातील येडूर, कल्लोळ, मांजरी आणि इंगळी तसेच रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती, दिग्गेवाडी, भिरडी आणि चिंचली परिसरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीत सध्या अत्यल्प पाणी शिल्लक असल्याचे चित्र आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सद्यस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात खड्डे खोदून पाणी काढावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून घेतलेली पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न तीव्र होत चालला आहे. या परिसरातील अनेक गावे पूर्णपणे कृष्णा नदीवर अवलंबून असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

कृष्णा नदीतील घटत्या पाणीसाठ्याचा परिणाम प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांवरही होत आहे. कंचकरवाडी, दिग्गेवाडी, बिरडी, जलालपूर आणि यड्रॉव या गावांना पाणीपुरवठा करणारी योजना तसेच बेंडवाड, मेखळी, हुब्बरवाडी, मंटूरसह ११ गावांचा समावेश असलेली दुसरी योजना बंद पडण्याच्या स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.

सौंदत्ती परिसरातील पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमधील जलपातळीही लक्षणीयरीत्या घटली असून, कूपनलिकांमधील पाणीसाठाही कमी झाला आहे.

या पार्श्वभूमीवर नदी पूर्णपणे आटण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारशी समन्वय साधून तातडीने पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे करण्यात येत आहे.