- अनमोड घाटात घडली दुर्दैवी घटना
खानापूर : प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि काँग्रेसचे सक्रिय नेते डॉ. केतन भाटीकर यांचे सर्पदंशामुळे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे फोंडा आणि परिसरात शोककळा पसरली असून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भाटीकर हे दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्यांनी प्रवास रद्द करून बेळगावला भेट दिली होती. त्यानंतर बेळगावहून फोंडा (गोवा) येथे परतत असताना अनमोड घाट परिसरात ते लघुशंकेसाठी थांबले. यावेळी त्यांच्या हातातील मोबाईल खाली पडला. मोबाईल उचलण्यासाठी त्यांनी झुडपात हात घातला असता विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला.
घटनेनंतर वाहनचालकाने त्यांना तातडीने धारबांदोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
डॉ. भाटीकर हे गोव्यातील नामांकित फिजिओथेरपिस्ट म्हणून परिचित होते. त्यांनी अलीकडेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
भाजप नेते रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. त्यांच्या विजयाबाबत राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चा सुरू असतानाच उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर ती निवडणूक रद्द करण्यात आली होती.
डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक सक्रिय आणि लोकप्रिय नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. डॉ. भाटीकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक सक्रिय आणि लोकप्रिय नेता गमावला असून त्यांच्या अकाली जाण्यामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.








