• अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कित्तूर : तालुक्यातील चिकबागेवाडी आणि एम. के. हुबळी दरम्यान झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असून, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावचे रहिवासी यासीन (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. यासीन हे एम. के. हुबळी येथून चिकबागेवाडी गावाच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की संबंधित वाहन त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी ‘हिट अँड रन’चा गुन्हा नोंदवला आहे. फरार वाहनचालकाचा शोध सुरू असून पुढील तपास कित्तूर पोलीस करत आहेत.