बागलकोट : जिल्ह्यातील हुनगुंद नगरपालिकेत भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढल्यानंतर लोकायुक्तांच्या पथकाने अचानक कारवाई करत कार्यालयावर धाड टाकली. ई-मालमत्ता, बांधकाम परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्रांसाठी नागरिकांकडून लाच मागितली जात असल्याच्या आरोपांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
कर्नाटक लोकायुक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी यांच्या निर्देशानुसार डीएसपी सुरेश रेड्डी व निरीक्षक बी. ए. बिरादार यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांनी नगरपालिकेची तपासणी केली. छाप्यावेळी विविध विभागांतील कागदपत्रांची पाहणी करण्यात आली तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशीही करण्यात आली.
तपासादरम्यान ई-प्रॉपर्टी नोंदी, उतारे आणि बांधकाम परवानग्या देण्यास मुद्दाम विलंब केला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून लोकायुक्तांकडून पुढील चौकशी सुरू आहे.








