बेळगाव : खासगी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांचे एपीएमसी बाजारात विलीनीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात बेळगाव येथील एपीएमसीच्या मूळ व्यापाऱ्यांनी आज एपीएमसी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयामुळे प्राथमिक व्यापारी आणि शेतकरी यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
बेळगावमधील खासगी भाजी मार्केट बंद झाल्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून तेथील व्यापाऱ्यांना रविवारी भरवण्यात येणाऱ्या शेतकरी बाजारात गाळे देण्यात आले आहेत. यामुळे एपीएमसीच्या हद्दीतच दोन स्वतंत्र बाजारपेठा निर्माण झाल्याने शेतमालाच्या किमतींमध्ये तफावत निर्माण होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली.
एपीएमसीच्या मूळ व्यापाऱ्यांनी आज कार्यालयासमोर निदर्शने करत खासगी व्यापाऱ्यांचे तातडीने मुख्य बाजारात विलीनीकरण करावे, अशी मागणी केली. व्यापारी सदानंद पाटील यांनी सांगितले की, सरकारी एपीएमसीमार्फत खासगी व्यापाऱ्यांना विशेष सुविधा दिल्या जात असून त्यामुळे मूळ व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाला योग्य दर मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना खासगी बाजारातील व्यापाऱ्यांना तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. मात्र खासगी बाजाराची कायदेशीर लढाई संपल्यानंतरही त्यांना सुविधा देणे चुकीचे असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. व्यापारी सतीश पाटील यांनी, “एपीएमसीमध्ये दुकाने भाड्याने घेऊन व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शुल्क आकारले जाते, मात्र खासगी बाजारातील व्यापाऱ्यांना विनामूल्य सुविधा देणे अन्यायकारक आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, एपीएमसी सचिवांनी सांगितले की, खासगी बाजार बंद झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार त्या व्यापाऱ्यांना रविवारी शेतकरी बाजारात तात्पुरती जागा देण्यात आली होती. आता प्रशासनाच्या सूचनेनुसार त्यांचे मुख्य बाजार परिसरात स्थलांतर करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यांच्याकडून वीज व इतर सुविधा शुल्कही आकारले जात आहे.
या आंदोलनात एपीएमसीचे माजी अध्यक्ष, व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








