• तक्रार नोंदवण्यात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
  • जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांची माहिती

बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि दगडखाणींना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने कडक भूमिका घेतली आहे. अवैध कारवायांविरोधात वेळेत गुन्हे नोंद न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिला.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एसपी रामराजन म्हणाले की, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध वाळू उत्खनन किंवा बेकायदेशीर दगडखाणी चालवण्यास मुळीच परवानगी दिली जाणार नाही. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाया सुरू असल्याची माहिती मिळेल, त्या ठिकाणी पोलीस स्वतः जाऊन तपास करतील. अवैध उत्खनन रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून विविध भागांत तपासणी मोहीम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून संबंधितांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

अवैध उत्खननातून मिळालेल्या मालमत्तेवर शासनाचा कर भरावा लागेल, जिल्ह्यात कुठेही अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित भागातील बीट कॉन्स्टेबल, पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना जबाबदार धरले जाईल. तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.