• जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेळगाव : शहर व जिल्ह्यातून गावठी दारू व अंमली पदार्थांची विक्री काटेकोरपणे थोपविण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. बुधवारी विविध खात्यांच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना दिली आहे.

बेळगाव दक्षिण व उत्तर अबकारी जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा घेण्यात आला. विशेषतः गावठी दारू व अंमली पदार्थांची विक्री थोपविण्यासाठी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्थायी समिती स्थापन केली आहे. केवळ पोलीस व अबकारीच नव्हे तर शिक्षण, वन खात्यासह विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनाही याकामी जुंपण्यात आले आहे. गावठी दारू थोपविण्यासाठी पोलीस,अबकारी व वनखात्याने संयुक्त मोहीम राबवून कारवाई करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. अबकारी विभागातून गेल्या वर्षभरात झालेले व्यवहार व सरकारच्या खजिन्यात जमा झालेला कर याचाही आढावा घेण्यात आला.

या बैठकीला पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी, अबकारी विभागाचे जगदीश कुलकर्णी, स्वप्ना, एन. सी. पाटील, विजय हिरेमठ, रवी मुरगोड, शंकरगौडा आदींसह पोलीस, अबकारी, परिवहन, शिक्षण व वनविभागातील अधिकारी उपस्थित होते.