• १६.५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त
  • टिळकवाडी पोलिसांची कारवाई

बेळगाव : अनगोळ परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

टिळकवाडी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी उज्वला रवी कम्मार आणि शिवा शंकर अप्पयनवर यांना ताब्यात घेतले. घरकाम करणाऱ्या महिलेनेच या चोरीचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.

अटक आरोपींकडून एकूण ११०.४९ ग्रॅम वजनाचे सुमारे १६.५७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये सोन्याची पाटी, अंगठ्या, नेकलेस, गंठण आदींचा समावेश आहे.

उज्वला कम्मार ही मूळची चित्रदुर्ग जिल्ह्यातील असून सध्या पिरणवाडीत घरकाम करत होती, तर शिवा अप्पयनवर हा हिंडलगा येथील रहिवासी आहे. दोघांनी मिळून चोरीचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम पूजेरी, पीएसआय विश्वनाथ घंटामठ, प्रभाकर डोळ्ळी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. या यशस्वी कामगिरीबद्दल संबंधित पथकाचे कौतुक करून त्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.