- सेल्फी व्हिडिओतून मांडली व्यथा
चिक्कोडी : व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे आणि गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चिक्कोडी शहरात घडली.
विनायक महादेव भंडारे असे त्या तरुणाचे नाव असून, त्याने आत्महत्येपूर्वी एक सेल्फी व्हिडिओ तयार करून आपली व्यथा व्यक्त केली. “मी जगणार नाही, आज माझा शेवटचा दिवस आहे,” असे म्हणत त्याने व्हिडिओमध्ये आपली मानसिकता व्यक्त केली. व्यवसायातील नुकसान आणि गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्याने केला आहे.
या व्हिडिओमध्ये त्याने काही व्यक्तींची नावे घेत त्यांच्याकडून त्रास होत असल्याचा दावा केला आहे. तसेच “पैसे घेतल्यामुळे माझी बदनामी झाली,” असा आरोप करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेपूर्वी त्याने एक पत्रही लिहिल्याचे समजते.
घटनेनंतर संबंधित तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








