- महापौर प्रीती कामकर यांचे आदेश
बेळगाव : शहरातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौर प्रीती कामकर यांनी दिले. महापालिकेच्या सभागृहात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकारी व कंपन्यांना कडक सूचना केल्या.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जलमंडळ आणि एल अँड टी कंपनीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. यावर त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.
अर्धवट राहिलेली पाईपलाईनची कामे पूर्ण करून ज्या भागात पाणीटंचाई आहे, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच विविध विकासकामांसाठी खोदलेले खड्डे वेळेत न बुजवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांनी मे महिन्यापर्यंत सर्व खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, मनोनीत नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी एल अँड टी कंपनीवर करारातील अटींचे उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचे पाईप वापरल्याचा आरोप करत दंडात्मक कारवाईची मागणी केली. नगरसेविका सारिका पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी नळजोडणी तक्रारी आणि बोअरवेल हस्तांतरणाच्या प्रलंबित मुद्द्यांवर संताप व्यक्त केला.
महापौरांनी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करत नागरिकांचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असे स्पष्ट निर्देश दिले. या बैठकीस उपमहापौर हनुमंत कोंगाळी, गटनेते संतोष पेडणेकर, स्थायी समिती सदस्य, विरोधी पक्ष सदस्य, मनपा आयुक्त कार्तिक एम. तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.








