• शहरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
  • सहा जणांना अटक

बेळगाव : बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांनी अवैध धंदे तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरकृत्यांविरोधात तीव्र मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. हिरेबागेवाडी परिसरात मटका रॅकेटवर छापा टाकून एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, दुसरीकडे एपीएमसी आणि मार्केट पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गांजाच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हिरेबागेवाडी पोलिसांनी बसापूर रस्त्यावरील परिसरात अचानक छापा घालून हुसेन बबनसाब जिहादूर या व्यक्तीला ताब्यात घेतले. तो सार्वजनिक ठिकाणी कल्याण मटका खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पीएसआय बसवराज मिटगार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. या छाप्यात रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून, आरोपीविरुद्ध कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शहरातील एपीएमसी आणि मार्केट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या पाच जणांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. एपीएमसी पोलिसांनी अभिषेक दौलत पाटील आणि विलास शंकर बाळेकुंद्री यांना अटक केली, तर मार्केट पोलिसांनी विजय संजय कविलकर, उत्कर्ष सुनील वर्मा आणि हर्ष सुनील वर्मा यांना ताब्यात घेतले.

सर्व आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल बेळगाव पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी पथकाचे कौतुक केले आहे.